Terna Co-Operative Mess-COE Osmanabad


या जेवण तयार आहे !
पण हे हॉटेल नाही.. ही आहे को-ऑपरेटिव्ह मेस !
विद्यार्थ्यांनी स्वत:साठी सुरू केलेली ती ही होस्टेलमधे.. आमचा नाराच आहे..
येथे घरच्यासारखे जेवण मिळेल, 'मेस'चे नाही !

कॉलेजला जायचं म्हटलं की, निश्चितच घरापासून दूर जावं लागतं. तिथे
हॉस्टेलला राहायचं नि मेसमध्ये जेवायचं ! मेसमधील जेवणाला घरच्या जेवणाची चव कधीच नसते. मेस शेवटी मेसचं !
अकरावी, बारावीची दोन वर्षे आणि त्यानंतर इंजिनिअरिंगमधील पहिली तीन वर्षे मेसमध्ये जेवण करून अगदी कंटाळा आला होता. मेसमध्ये जेवायला बसलं की, पहिल्यांदा घरच्या जेवणाची आठवण व्हायची. शेवटी मेसच्या जेवणाला कंटाळून आमच्या ग्रुपमध्ये (आमचा ग्रुप म्हणजे तेरणा इंजिनिअरिंग कॉलेज, उस्मानाबाद येथील सिनिअर हॉस्टेलमधील मुलंाचा ग्रुप) एक भन्नाट कल्पना सुचवली. ती म्हणजे सर्व मुलांनी मिळून एक को-ऑपरेटिव्ह मेस सुरू करायची. को-ऑपरेटिव्ह मेसची कल्पना अगदी पक्की झाली. कॉलेजमध्ये प्रस्ताव मांडला. बऱ्याच अडचणींवर मात करून आम्ही कॉलेजकडून मान्यता मिळवली. आमच्या हॉस्टेलच्या शेजारीच मेससाठी जागा होती. एक मोठा हॉल व जोडूनच किचन होते. आम्ही सर्व मुलांनी व हॉस्टेलच्या कर्मचाऱ्यांनी मिळून ती जागा स्वच्छ केली. कॉलेजमार्फत आवश्यक मदत आम्ही मिळवली. टेबल, खुर्च्या, गॅस शेगडी व इतर आवश्यक सर्व सामान कॉलेजने पुरविले. 
              होस्टेलमध्ये एकूण अडीचशे विद्यार्थी होते. पन्नास विद्यार्थी मेससाठी घेण्याची परवानगी होती. आमचा वीस-पंचवीस जणांचा ग्रुप आधीच तयार होता. पण त्यानंतर मुले मिळेनात. कारण त्यांना असं वाटत असावं की, ही मेस काही चालणार नाही, लगेच बंद पडेल. खूप विनवण्या करून, कसे तरी पन्नास विद्यार्थी जमवले आणि तो दिवस उजाडला...!१५ ऑगस्ट २००९. हाच तो दिवस ! खूप थाटामाटात या दिवशी तेरणा को-ऑपरेटिव्ह मेसचं उदघाटन झालं. चेअरमन, खजिनदार, बॉडी मेंबर ठरले. दहा-दहा मुलांचे पाच ग्रुप ठरविण्यात आले. नियम तयार केले, स्वयंपाकासाठी दोन महिला होत्या आणि एकदाची झाली मेस सुरू... प्रत्येक आठवड्याचे कामकाज एकेका ग्रुपकडे दिले होते. आवश्यक भाजीपाला व किरणा हे त्या त्या आठवड्याच्या ग्रुपने आणायचे. प्रत्येक मुलावर एक विशिष्ट जबाबदारी सोपवण्यात आली होती.
                तब्बल दोन सेमेस्टर आम्ही ही मेस कसल्याही तक्रारीशिवाय चालवली. कधीच कुठल्याही प्रकारची मोठी अडचण आली नाही. आमच्या या प्रयत्नात आम्हाला अपेक्षेपेक्षा जास्त यश मिळालं होतं. कमी पैशात दर्जेदार जेवण आम्हाला मिळत होतं. सर्व अडचणींवर आम्ही मात केली. कारण एकचं होतं. आमच्या ग्रुपची एकता आणि समजूतदारपणा ! आमच्यातील एकता कधीच दुभंगली नाही. आता तर पूर्ण हॉस्टेलमधील मुले मेसचे मेंबर होण्यास उत्सुक आहेत, नव्हे, मागे लागलेत.
या प्रयत्नातून आम्ही बरेच काही शिकलो. आम्ही प्रत्यक्षात बाजारात उतरलो.बाजारभाव, व्यवहार, व्यवस्थापन कळालं. व्यवसाय हा नेमका कसा असतो त्याची प्रत्यक्ष अनुभूती आली. बस्स ! आणखी काय पाहिजे?
तुम्हीही तुमच्या होस्टेलच्या मेसमध्ये जेवण करून बोअर झाला असाल, तर अशीच एखादी को-ऑपरेटिव्ह मेस सुरू करायला काही हरकत नाही ! बघा, मजा येईल! अनुभव मिळेल तो वेगळाच !

- रूपेश अंकुश मोटे
तेरणा को-ऑपरेटिव्ह मेसमधील एक 'मेंबर'